बनावट चलन सादर करून जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 June 2026


सातारा : जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून तब्बल 28 लाख 50 हजार 950 रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागांतर्गत विविध कामांना मंजुरी देण्यात आली होती. या कामांसाठी एल-1 अर्थात न्यूनतम दर देणारे ठेकेदार म्हणून निवड झाल्यानंतर शासनाकडे जमा करावयाची सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव प्रत्यक्षात न भरता बँकेचा बनावट रिसिव्हड शिक्का, खोटा डेटर आणि कॅशियरची बनावट सही वापरून चलने तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.

यातील आरोपी योगेश रवींद्र बर्गे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याने 15 मे 2026 रोजी 14 लाख 23 हजार 500 रुपये भरल्याचे बनावट चलन सादर केले. तर विजय बापूसाहेब घाडगे (रा. विक्रांतनगर, संभाजीनगर एमआयडीसी, सातारा) याने 18 मे 2026 रोजी 14 लाख 27 हजार 450 रुपये भरल्याचे चलन सादर केल्याचे समोर आले आहे.

या दोघांनी मिळून एकूण 28 लाख 50 हजार 950 रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. हा प्रकार 15 आणि 18 मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयात घडल्याचे सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी कर्मचारी अरुणकुमार शंभू दिलपाक (वय 58, रा. सत्यम सोसायटी, सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटोळे पुढील तपास करीत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर परिसरातील लॉजिंगमध्ये अश्लील कृत्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
धनगरवाडी, ता. सातारा येथील युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद

संबंधित बातम्या