दहिवडी : माण तालुक्यात ५ तारखेला बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक बॉम्बस्फोटासारखे दोन प्रचंड मोठे आवाज झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांमुळे अनेक घरे आणि मोठ्या इमारतींना तीव्र धक्का बसला.
बुधवारी दुपारी अचानक एकापाठोपाठ एक अशा दोन मोठ्या स्फोटांसारख्या आवाजांनी माण तालुका थरथरला. या आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की, झोपलेली लहान मुले दचकून उठली आणि रडू लागली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, नागरिक काय घडले हे पाहण्यासाठी तातडीने घराबाहेर पडले. परिसरात सर्वत्र शोधाशोध आणि एकमेकांकडे विचारणा सुरू होती; मात्र आवाजाचे मूळ कारण किंवा ठिकाण कोणालाही स्पष्ट होऊ शकले नाही.
घडलेल्या या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, हा आवाज कशाचा होता आणि तो कुठून आला याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तसेच, जर हा प्रकार बेकायदेशीर स्फोटकांमुळे झाला असेल, तर अशा स्फोटकांवर व उत्खननावर तात्काळ बंदी घालून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी तीव्र भावना स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे.