महावितरणच्या उपकेंद्रांसाठी गुणवत्तेसह सुरक्षेचेही ‘आयएसओ’ मानांकन घ्यावे : संचालक राजेंद्र पवार

by Team Satara Today | published on : 06 June 2025


पुणे : सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वीज उपकेंद्र अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांमध्ये सर्व प्रकारची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी ‘आयएसओ ९००१:२०१५’ चे मानांकन घेण्यात येत आहे. त्यासह सर्व उपकेंद्रांनी सुरक्षा मानके पूर्ण करण्यासाठी ‘आयएसओ ४५००१:२०१८’ चे स्वतंत्र मानांकन घेण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले.

महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पुणे येथील पद्मावती विभागाच्या साईमिस्टिक २२/२२ केव्ही उपकेंद्राने सुरक्षा वर्गवारीत ‘आयएसओ ४५००१:२०१८’ चे मानांकन मिळवले आहे. धनकवडीमध्ये साईमिस्टिक उपकेंद्रात बुधवारी (दि. ४) आयोजित कार्यक्रमात संचालक पवार यांच्याहस्ते  उपकेंद्राला सुरक्षेचे ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे (पुणे), स्वप्निल काटकर (कोल्हापूर) आणि श्री. धर्मराज पेठकर (बारामती) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.  

संचालक पवार म्हणाले की, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यातील वीज उपकेंद्रांची निगा, गुणवत्ता व सुरक्षा आदींबाबत उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदींबाबत सुधारणा सुरू आहे. गुणवत्तेच्या या मानकांचे पालन करण्यासोबतच उपकेंद्रांनी प्रामुख्याने सुरक्षा मानके पूर्ण करून ‘आयएसओ ४५००१:२०१८’ चे मानांकन घेण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे म्हणाले की, गुणवत्तेएवढीच सुरक्षाही अतिशय महत्त्वाची आहे. सुरक्षेअभावी मालमत्तेचे नुकसान झाले तर ते भरून काढता येईल. मात्र प्राणांतिक अपघातामुळे झालेले नुकसान कोणत्याही प्रकारच्या भरपाईने होऊ शकत नाही. त्यामुळे पुणे प्रादेशिक विभागातील उपकेंद्रांमध्ये गुणवत्तेसोबतच महत्त्वाच्या सुरक्षा मानकांची पूर्तता करून ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविण्यात येईल.

‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. संजय घोडके, सहायक अभियंता प्रभाकर पवार तसेच बाबासाहेब शिंदे, पुंडलिक काशिद, सिद्धार्थ एकबोटे, प्रतिक शिंदे, अक्षय वाघमोडे यांनी कामगिरी केली. त्यासाठी ‘आयएसओ’चे परीक्षक नंदकिशोर देशमुख, मोनिका पदकोंडे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते सर्वश्री ज्ञानदेव पडळकर, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अमित कुलकर्णी यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार
पुढील बातमी
हनीमूनला गेलेलं जोडपं बेपत्ता

संबंधित बातम्या