पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात सर्वधर्मियांनी एकत्रित येवून केलेल्या आंदोलनानंतर रकारला नमते घ्यावे लागते, हीच सुसंस्कृत राज्यातील समाजकारणाची पोहच पावती आहे. बीड मध्ये घडलेले संतोष देशमुख हत्याकांडानंतर समाजाने सरकारला या प्रकरणाची दखल घेण्यास भाग पाडल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणी लक्ष घातले. आतापर्यंत तथाकथित राजकीय नेत्याचे आश्रयप्राप्त खंडणीखोर गुंडांना त्यामुळे आत्मसमपर्ण करावे लागले. आता, आत्मसमर्पित वाल्मिक कराड यांचे आश्रय दात्यांना राजकारणातून हद्दपार करण्याची वेळे आली आहे. या हत्याकांडातील इतर फरार तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.१) व्यक्त केले.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा बांधवांनी ठरवले तर ते काय करू शकतात, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे देखील पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे केंद्रबिंदू असलेला कराड याच्या अटकेनंतर आता त्याची टोळी उद्ध्वस्त होईलच पंरतु, त्याला आतापर्यंत साथ देणारे पोलीस दलातील अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी यानिमित्त सरकारकडे केली आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे समोर आली होती. या राजकीय आरोपांमध्ये तथ्य असल्यास सरकारने संबंधीत नेत्यांवर कारवाई करावी,अशी मागणी देखील पाटील यांनी यानिमित्ताने केली.
संतोष देशमुख प्रकरणात जातीय राजकारण करण्यात आले. पंरतु, या प्रकरणात जातीचे राजकारण करू नये. हा प्रश्न जातीपातीचा नसून कायदा-सुव्यवस्थेचा आहे. आरोपींची आणि खंडणीखोरांची कुठली जात नसते. गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी समाजाला एकत्रित व्हावेच लागेल. तळागाळातील नागरिकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी लढा उभारावाच लागेल. त्यांचा आवाज व्हावा लागेल, असे मत व्यक्त करीत मराठा-ओबीसी बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन पाटील यांनी केले.