‘राजधानी जल्लोष दांडिया’ उत्साहात संपन्न; मिनल राऊत ठरल्या ‘दांडिया क्वीन’

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : येथील लँडमार्क टॉवर येथे आयोजित ‘राजधानी जल्लोष दांडिया सेलिब्रेशन २०२६’ सोहळा हजारो महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि प्रचंड उत्साहात संपन्न झाला. कंग्राळकर असोसिएट्स, मराठा बिझनेस फोरम आणि पिंकोलिक इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषेत दाखल झालेल्या महिला आणि युवतींनी दांडियाच्या तालावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. या महोत्सवात रंगलेल्या विविध स्पर्धांमुळे कार्यक्रमाची चुरस व रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. यामध्ये ‘राजधानी जल्लोष दांडिया क्वीन’चा बहुमान सौ. मिनल अनिरुद्ध राऊत यांनी पटकावला, तर वृद्धी बारटक्के या उपविजेत्या ठरल्या. सांघिक नृत्य स्पर्धेत विद्या झुंबा ग्रुपने प्रथम, तर झिन प्रिया ग्रुपने द्वितीय क्रमांक संपादन केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षा सीमा जाधव, शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा स्वाती चव्हाण, मराठा मोर्चा समन्वयक स्मिता पाटील आणि पिंकोलिक इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका जयश्री शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. या महोत्सवाला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कंग्राळकर असोसिएट्सचे श्रीधर कंग्राळकर, नगरसेवक रवी किर्दत तसेच बालाजी मोबाईल्सचे संतोष शेडगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या सोहळ्यास बालाजी मोबाईल्स, वेदानोव्हा, माय बॉडी कोड, सॅफ्रॉन स्काय, डी रोमा, जावेद हबीब पार्लर, नियंता लिनन डेकोर आणि शंकर विलास रेस्ट्रो यांचे विशेष सहकार्य लाभले. महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा आणि सक्षमीकरणासह उत्साहाचा प्रत्यय घडवणारा हा दांडिया महोत्सव उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साडेपाच हजारांच्या दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक; कराड-पाटण मार्ग रोखला, दर दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार

संबंधित बातम्या