महापुरुषांच्या अवमानाबाबत कठोर कायदा करा

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली अमित शहा यांची भेट

सातारा : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि एकंदरीत सर्व महापुरुषांच्या अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांच्या संदर्भात केंद्र शासनाने कठोर कायदा पारित करावा व छत्रपती शिवरायांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभे करावे. याशिवाय ऐतिहासिक चित्रपटांचे सिनेमॅटिक लिबर्टी चे नियमन करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली जावी, अशा विविध मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र शासनाकडे केल्या आहेत.

खा. उदयनराजे यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केले. यानंतर जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात नमूद आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आणि वारसा अतुलनीय आहे. संपूर्ण देशात आणि जगात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. छत्रपती शिवरायांसह एकूणच सर्व महापुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात. यासंदर्भात कठोर कायदेशीर कारवाई होण्यासाठी स्वतंत्र कायदा होणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनाची ओळख होण्यासाठी व पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी छत्रपती शिवरायांचे दिल्ली येथे स्मारक व्हावे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे जतन आणि अचूक दस्तऐवजीकरण सुनिश्चित केले जावे. ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबत दिग्दर्शक नेहमीच सिनेमॅटिक लिबर्टी घेतात. मात्र ते करताना ते वस्तुस्थितीशी निगडित असावे, याचे नियमन करणारी स्वतंत्र समिती स्थापन केली जावी. सर्व चित्रीकरण हे वस्तुस्थितीपूर्ण असावे. त्यामुळे विनाकारण उफाळून येणारे वाद घडणार नाहीत. केंद्रशासन व राज्य सरकारने सेन्साॅर बोर्डाला मदत करण्यासाठी इतिहास तज्ञ, आमची मदत घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवेदनाला अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे यावेळी उदयनराजे यांच्या समवेत काका धुमाळ, एडवोकेट पाटील उपस्थित होते.



मागील बातमी
म्हसवडमध्ये तीन हजार एकरांत एमआयडीसी : उदय सामंत
पुढील बातमी
विधी सेवा प्राधिकरणामार्फत माहिती अधिकार कायदा-2005च्या जनजागृतीसाठी कार्यशाळा

संबंधित बातम्या