सातारा : वटपौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड देत रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा तसेच पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने वडाचे रोप लावून वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. धार्मिक परंपरेसोबत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. केवळ झाडांची पूजा करण्यापेक्षा अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करणे हीच खरी निसर्गसेवा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. उपक्रमाची माहिती जयंत देशपांडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कृषी सहायक अधिकारी सौ. हेमलता फडतरे यांनी कृषी विभागाच्या विविध वृक्षसंवर्धन योजनांची माहिती देत प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
सौ. सरिता शिंदे यांनी पर्यावरण संरक्षणाची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी, असे सांगत प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.
या उपक्रमात योग विद्या धाम, सृष्टी सामाजिक संस्था, स्फूर्ती वुमन विंग, बी.आय.ए. सातारा, साधना इंग्लिश मिडीयम स्कूल, सुवर्धिनी फाउंडेशन यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
शैलजा ठोके, वैशाली फडणीस, मंजिरी दीक्षित, वृंदा शिवदे, डॉ. धनश्री पाटील, रागिणी जोशी, सुप्रिया भिडे, ऍड. मानसी वैद्य, डॉ. स्वाती श्रोत्री, ऍड. सुचेत्रा काटकर, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. दीपक निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपात मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानत, परंपरा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन केले. संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... या अभंगाचा संदेश स्मरणात ठेवत परंपरा जपूया, वृक्षसंवर्धनातून पर्यावरण वाचवूया... असा निर्धार उपस्थितांनी केला.