पुसेसावळी : पुसेसावळी (ता. खटाव) येथील कराड रस्त्यालगत असलेल्या रविराज स्टील व फर्निचर या भांड्याच्या दुकानाचा पत्र्याचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्याने ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्याने दुकानातील तांब्या-पितळेची भांडी चोरून नेण्याबरोबरच सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळवला. गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानमालक राजेंद्र महादेव वालेकर यांनी बुधवारी रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. रात्रीच्या वेळी चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूच्या पत्र्याच्या दरवाजाचे नट-बोल्ट काढून उचकटले त्यानंतर सुमारे ३ लाख रुपये किमतीची तांब्याची भांडी, २ लाख रुपये किमतीची पितळेची भांडी आणि एक हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही डीव्हीआर असा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास वालेकर दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
बसस्थानकाच्या दक्षिणेकडील कुंपणालगतच्या मोकळ्या जागेत भांड्यांचे काही बॉक्स व अन्य वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. चोरीसाठी या निर्जन जागेचा वापर केला असण्याची शक्यता तपासली जात आहे. यापूर्वी जिल्हा बँकेवर दरोडा पडला होता, त्यावेळीही बसस्थानकाच्या मोकळ्या जागेचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सपोनि सुनील जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मयेकर तपास करत आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. फॉरेन्सिक पथकाने ठसे घेतले असून, श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने बसस्थानकाच्या मागील मोकळ्या जागेपर्यंत माग काढला; मात्र त्यानंतर तो माघारी फिरला.
पुसेसावळीत कराड रस्त्यालगत असलेल्या भांड्याच्या दुकानात चोरी; ५ लाखांचा मुद्देमाल लंपास
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
पाडळीत बंद घर फोडून ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
September 10, 2026
सदर बाजारातून अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली
September 10, 2026