दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी नियोजन महत्त्वाचे - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर; येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

by Team Satara Today | published on : 09 November 2026


खटाव, : दुष्काळाची समस्या केवळ पावसाच्या अभावापुरती मर्यादित नाही. त्यामागे सिंचनातील त्रुटी, पाण्याचे अयोग्य नियोजन, अपव्‍यय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असमतोल अशीही कारणे आहेत. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी केले.
माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘दुष्काळातून सावरण्यासाठी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी सदस्य अशोकराव कुदळे, खटाव-माण ॲग्रो प्रोसेसिंगचे संचालक राहुल पाटील, ज्येष्ठ पत्रकार भद्रेश भाटे, समुपदेशक किशोर काळोखे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
डॉ. हातेकर म्हणाले, ‘‘देशातील मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी महाराष्ट्रात सुमारे ४२ टक्के प्रकल्प असतानाही अनेक भागांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. प्रशासकीय दिरंगाई, अपुरे नियोजन आणि प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांमुळे खर्च तर वाढतोच; पण पाण्याचा लाभही लांबणीवर पडतो.’’
प्रदीप विधाते यांनी गेली ३१ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशोक कुदळे व राहुल पाटील यांनी एम. आर. शिंदे सरांचे विचार पुढील पिढीलाही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. किशोर काळोखे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार अविनाश कदम यांनी सूत्रसंचालन केले. लेखक, निर्माते तेजपाल वाघ यांनी आभार मानले. नितीन शिंदे, चारुदत्त शिंदे, मनोज शिंदे यांनी स्वागत केले.
या वेळी विलास भोसले, जीवन इंगळे, अरुण आदलिंगे, रसूलभाई मुल्ला, अमर देशमुख, डॉ. रामचंद्र कोरडे, मनोज देशमुख, ॲड. एम. ए. काझी, प्रकाश जाधव, शेखर देशमुख, संजय घाडगे, वैभव फरांदे, प्रा. महेश भदाणे, प्रा. गंगाराम शिंदे, किरण राऊत, अभय शिंदे, गणेश शेडगे, रमेश अडसूळ, शरद कुदळे, सर्जेराव शिंदे, यशवंत शिंदे, पत्रकार, अंबाबाई क्रीडा मंडळ आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्‍थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपला पर्याय देण्यासाठी जनतेसमोर नेतृत्वाचा चेहरा उभा करणे आवश्यक - पृथ्वीराज चव्हाण, इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवा

संबंधित बातम्या