कराडमधील विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनी आक्रमक; हातात 'तिरंगा, फलक' घेऊन रस्त्यावर, घोषणाबाजी करत एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

by Team Satara Today | published on : 09 September 2026


कराड : पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर कराडमधील विद्यार्थ्यांनी देखील मंगळवारी परीक्षा पद्धतीतील गैरप्रकार आणि सरकारी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दत्त चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला. यावेळी 'एमपीएससी'च्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, सर्व स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र ऑडिट करून गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गेल्या काही काळापासून विविध शासकीय भरती आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात साधारण ३५ लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व इतर शासकीय भरतीसाठी प्रयत्न करीत असतात. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. परंतु स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीच्या वाढत्या घटनांमुळे या लाखो युवकांच्या भवितव्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
‘या’ केल्या महत्त्वाच्या मागण्या: सर्व पेपर फुटी व शासन भरतीमधील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी. चौकशीसाठी 'एसआयटी'ची विशेष तपास पथकाची नेमणूक करावी. सीबीआय मार्फत चौकशी करून सर्व दोषींना अटक करावी. शासन भरती गैरव्यवहारांतील दोषींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी. दोषींच्या कुटुंबीयांच्या सर्व मालमत्तेची चौकशी करणारा कडक कायदा तत्काळ लागू करावा. पेपरफुटी, शासकीय भरती गैरव्यवहाराचा निकाल जलद लागण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करावी. सर्व परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश पारित करावे. रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे. पुढील सर्व होणाऱ्या स्पर्धा परीक्षा या मोफत घेण्यात याव्यात.
कराड येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कराडमधील स्पर्धा परीक्षेचे तयारी करणारे विद्यार्थी युवक-युवती या मोठ्या संख्येने एकत्रित आल्या. यावेळी कुणी हातात तिरंगा घेत 'इन्कलाब जिंदाबाद','एमपीएसी'चे अध्यक्ष राजीनामा द्या..., अशा घोषणा दिल्या तर कुणी 'एमपीएससी पेपर मिळतील पार्किंगमध्ये', 'एमपीएससी मेहनत कि पैशांचा खेळ?' टाईमपास नव्हतो तो...' अशा आशयाचे फलक हातात घेत युवतींनीही आक्रमक पावित्रा घेतला.
'गणपती बाप्पाच्या मोदकाच्या’ पोस्टरची आंदोलनस्थळी चर्चा
कराडात मंगळवारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनी युवतीने ‘गणपती बाप्पा म्हणतो, माझे एकवीस मोदक तुम्ही खा पण तेवढा पेपर फोडू नका गड्या हो! पेपरफुटी अशा आशयाचा फलक, पोस्टर धरला होता. आंदोलनस्थळी असलेल्या या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आता २५ दिवसांनी करता येणार गॅस सिलिंडरचे बुकिंग; बुकिंगवरील निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केले, ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा
पुढील बातमी
निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय; विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासकपदाची जबाबदारी

संबंधित बातम्या