सातारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसवे गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलाखाली एका इसमावर कारवाई करून त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व दोन मोटरसायकल असा दोन लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये बाकीचे संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगारांना तपासण्याची मोहीम हाती घेतली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व परितोष दातीर यांच्या दोन स्वतंत्र पथकाने महामार्ग 48 वर पेट्रोलिंग करत असताना म्हसवे गावच्या हद्दीत डी-मार्ट ते वाढे फाटा यादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर तीन अनोळखी इसमांना हटकले. त्यापैकी दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळाले.
यावेळी पोलीस अभिलेखावरील आरोपी प्रथमेश उर्फ बाळासाहेब जगताप रा. वर्ये, तालुका जिल्हा सातारा या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कब्जातून एक लाख 40 हजार रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्टल, 600 रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे व 85 हजार रुपयांच्या दोन मोटरसायकली असा दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नोव्हेंबर 2022 पासून सातारा पोलिसांनी 95 देशी बनावटीच्या पिस्टल्स, 12 बोअरच्या रायफली, 221 जिवंत काडतुसे व 377 रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
या कारवाईमध्ये अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, निलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, अमोल माने, प्रवीण कांबळे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अजित करणे, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, केतन शिंदे, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, प्रवीण पवार, प्रीती पोतेकर, शिवाजी गुरव, अमृत कर्पे यांनी सहभाग घेतला होता.
सातारा पोलिसांकडून दोन देशी बनावटीची पिस्टल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त
by Team Satara Today | published on : 10 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा