जेन झींना मोहन भागवत यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही - प्रियांका गांधींची प्रतिक्रिया; अमित शाहांवरही जोरदार टीका

by Team Satara Today | published on : 07 August 2026


दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘जेन झीं’चे समर्थन केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधींनी प्रतिक्रिया देताना तरुण आंदोलकांना मोहन भागवत यांच्या कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असे वक्तव्य केले आहे. मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमात जेन झींशी संवाद साधला. तरुणांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत भागवतांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तरुणांनी केलेले आंदोलन त्यांना राष्ट्रविरोधी ठरवत नाही, असेही भागवत म्हणाले.

भागवत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही – प्रियांका गांधी

मोहन भागवत यांनी यावेळी लोकशाहीत निदर्शने संवादाचे एक वैध माध्यम असल्याचेही स्पष्ट केले. भागवत यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रियांका गांधी यांनी संसद भवन परिसरात उत्तर दिले. “तरुणांना मोहन भागवत यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. गृहमंत्री घाबरले आहेत असा आरोप करत त्यांनी अमित शाह संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनुपस्थित का आहेत? असा सवाल उपस्थित केला.

अमित शाहांवर टीका

नीट पेपरफुटी प्रकरणी २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि इतर कारवाईचा उल्लेख यावेळी प्रियांका गांधी यांनी यावेळी केला. “शाहांनी सभागृहात येऊन याप्रकरणी भूमिका स्पष्ट करायला हवी, यात अडचण काय आहे? काही चुकीचे घडले असेल, तर त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, दुसरा हप्ताही लवकरच वितरीत करण्यात येणार

संबंधित बातम्या