महाशिवरात्री जागरण सोहळा उत्साहात संपन्न

by Team Satara Today | published on : 27 February 2025


सातारा : सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गेले दहा दिवस महाशिवरात्रीनिमित्त संगीत नृत्य व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीला रात्री दहा वाजता या महाजागरणला दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. सातारा येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना नंदिता कुलकर्णी, सौ. आंचल  घोरपडे, सौ. उषा शानभाग, नृत्य साधनाचे गुरु सुधांश किरकिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रारंभी नंदिता कुलकर्णी यांचे अतिशय सुरेख कथक नृत्य झाले. त्यानंतर नंदिता यांचा सत्कार आचल घोरपडे यांनी केला. नृत्य साधना संस्थेचे गुरु सुधांश किरकिरे यांच्या शिष्यांनी भरत नाट्यम मध्ये मार्गम नृत्य सादर केले. या कलाकारांचा सत्कार उषा  उषा शानभाग  यांच्या हस्ते करण्यात आला. 

त्यानंतर या जागरण कार्यक्रमात त्रिवेणी थोरात यांनी अतिशय सुंदर असे मंडळ आर्ट ची माहिती सांगून मंडल ध्यान घेतले. यामध्ये सातारकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा प्रकार सातारकर नागरिकांसाठी अतिशय नवीन प्रकारचा होता.

त्यानंतर सौ. शांता पाटणे यांनी गुरुचरित्रामधील शिवमहिमा तसेच बिल्व पत्राचा महिमा याची कथा प्रवचनाद्वारे उपस्थित त्यांना सांगितली ,त्यानंतर  सौ. उषा शानभागनी कुंभ स्नान ध्यान प्रकार घेतला. नंतर मेघा मोरे यांनी शरीर, आहार याचा योगसाधनेतील महत्त्वाचा टप्पा सांगून रामचंद्र भगवानाचा त्रयोदक्षरी नाम जप घेतला आणि या जपावर  सौ. उषा शानभाग यांनी चक्र ध्यान घेतले.

या जागरण सोहळ्यात सुनील पानसे यांनी प्राणायाम त्रीबंध शिकवले नंतर पुन्हा ध्यान व जागरण कार्यक्रमात उज्वला पाटणे आणि सुनीता पाटणे यांनी नवाक्षरी आणि महामृत्युंजय मंत्र साधना घेतली. नंतर पंचतत्व ध्यान, तीन ग्रंथी बंध ध्यान, अष्टचक्र साधना ध्यान, शिवशक्ती पूजा ध्यान, ज्योतिर्लिंग ध्यान अशा विविध ध्यानांचे प्रकार करून घेतले.

सकाळी साडेसहा वाजता श्री गुरु आणि भगवान शंकराच्या पिंडीवर आरती करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास सातारकरांनी संपूर्ण रात्रभर मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला. त्याबद्दल नटराज मंदिराचे वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘जिहे-कठापूर'ला सोडलेले पाणी बंद करा
पुढील बातमी
संगम माहुली - क्षेत्र माहुली येथील घाट आणि नदीपात्र विकसीत करण्यात यावे!

संबंधित बातम्या