तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये रंगणार साहित्य मेळा

चोवीसाव्या ग्रंथ महोत्सवाचे 10 जानेवारी रोजी उद्घाटन

by Team Satara Today | published on : 07 January 2025


सातारा : येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये 24 वा ग्रंथ महोत्सव दिनांक 10 ते 13 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार राजीव खांडेकर व ज्येष्ठ लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, सहसमन्वयक डॉ. राजेंद्र माने, सुनीता कदम, नंदा जाधव, प्रमोदिनी मंडपे, निवृत्त शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्रल्हाद पारटे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

चिटणीस पुढे म्हणाले, दिनांक 13 रोजी सकाळी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडी पूजनाने ग्रंथ महोत्सवाची सुरुवात होणार आहे. ही ग्रंथ दिंडी राजवाडा मैदान ते सातारा जिल्हा परिषद या दरम्यान निघणार आहे. सातारा शहरातील चाळीसहून अधिक शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर व लेखक कवी प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत ग्रंथ संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. दुपारी दोन ते पाच या वेळेत कथाकथन रंगणार असून रवींद्र कोकरे, राजेंद्र कणसे यांच्या कथा रंगणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्निल कोरे असून दैनिक प्रभात चे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांची प्रमुख उपस्थिती आहे. आयाम इनामदार, श्राव्य गायकवाड, नारायणी इंगवले, आर्या नाळे, आस्था धनवडे, मिथिली शिंदे, सोनम लवटे, मेघना गावडे, पायल खामकर, प्रज्ञा कुंभार, स्वरांजली धनवडे, तनवी बाबर हे बाल विद्यार्थी कथा सादर करणार आहेत. सायंकाळी पाच ते साडे सहा या दरम्यान तर्कतीर्थांची स्मरणगाथा या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सात वाजता स्वर नाद निर्मित सप्तसुरांचे इंद्रधनु ही हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मैफल रंगणार आहे.

शनिवार दिनांक 11 रोजी धमाल गप्पाटप्पा, गोष्टी, गाणी, गोष्टींचे झाड हे लेखिका पत्रकार स्वाती राजे यांचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. दिलीप गरुड यांचे सुद्धा सादरीकरण यावेळी होणार आहे. दुपारी 11 ते अडीच या दरम्यान निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून देवा झिंजाड अनिल दीक्षित बंडा जोशी व कांता भोसले हे निमंत्रित कवी असणार आहेत. दुपारी तीन ते पाच या वेळेत वाढते पर्यटन व ढासळते पर्यावरण हा परिसंवाद रंगणार असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य कार्यवाह डॉ. अविनाश ढाकणे यामध्ये सहभागी होणार आहेत डॉ. मधुकर बाचुळकर, उमेश झिरपे, आनंद सराफ संध्या चौगुले यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी सहा ते सात या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या वळणावरची माणसं या पुस्तकातील विविध पात्रांचा अभिवाचनाचा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे डॉ. आदिती काळमेख, वैदेही कुलकर्णी, व चंद्रकांत कांबिरे हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

रविवार दिनांक 12 रोजी सकाळी साडेआठ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दुपारी अडीच ते साडेचार कादंबरीकार मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार सुनीता राजेपवार व शिरीष चिटणीस घेणार आहेत दुपारी चार ते सहा या वेळेत मराठी अभिजात झाली आता वाटचाल कशी होणार ? हा परिसंवाद होत असून यामध्ये मराठी राजभाषा महाराष्ट्र शासनाच्या उपायुक्त अंजली ढमाळ, विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, दैनिक लोकमतचे प्रमुख उपसंपादक दीपक शिंदे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सायंकाळी सात वाजता चंदेरी दुनियेतील श्वेत पर्व या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्मिती श्वेता शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. संयोजन समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.

येथे घडतात वाचक वक्ते हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ ते एक या वेळेत रंगणार असून पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर व ज्येष्ठ पत्रकार दीपक प्रभावळकर आणि संत साहित्याच्या अभ्यासिका प्राची गडकरी यामध्ये सहभागी होणार आहेत. सायंकाळी सात वाजता गाणी मनातली हा विजय साबळे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये डॉ. सुनील पटवर्धन, डॉ. लियाकत शेख, विजय साबळे, वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, ममता नरहरी हे सहभागी होणार आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देऊरचा अनिकेत शिंदे यूपीएससी परीक्षेत देशात १८ वा
पुढील बातमी
सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी; बीड घटनेवर पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

संबंधित बातम्या