एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा; २० एप्रिलला गांधी मैदानावर होणाऱ्या सभेची जोरदार तयारी

पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

by Team Satara Today | published on : 16 April 2026


सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, येत्या सोमवार, दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान, राजवाडा येथे ती पार पडणार आहे. या सभेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी पत्रकार परिषदेत सभेची माहिती देताना मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला माजी आमदार दगडू सपकाळ, हनुमंत जगदाळे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच रेश्मा जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपली ताकद वाढवली असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. जिल्हा परिषदेत १५ सदस्य आणि पंचायत समित्यांमध्ये सुमारे ३० जागांवर विजय मिळाल्याने पक्षाची पकड मजबूत झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर होणारी शिंदे यांची सभा ही केवळ राजकीय मेळावा न राहता आगामी रणनीतीचे संकेत देणारी ठरण्याची शक्यता आहे. तसेच, इतर पक्षांतील काही कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याचीही चर्चा रंगली आहे.

सभेसाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झेडपीच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष; सभा वादळी ठरणार का ? विरोधकांची भूमिका काय राहणार?
पुढील बातमी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यूप्रकरणी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शिकलगार यांच्यावर गुन्हा; आरोग्य उपसंचालकांची फिर्याद

संबंधित बातम्या