सातारा नगरपरिषदेत संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम; डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन, २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली

by Team Satara Today | published on : 27 November 2026


सातारा : भारतीय लोकशाहीचा पाया रचणाऱ्या संविधानातील विचारांचा जागर करण्यासाठी सातारा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून लोकशाही मूल्यांच्या जतनाचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणारे शहीद जवान आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. देशाच्या सार्वभौमत्वाच्या आणि सुरक्षेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृतींना उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते क्षितिज गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा प्रवास, संविधान सभेतील महत्त्वपूर्ण चर्चा, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक योगदान आणि संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना बहाल केलेले मूलभूत अधिकार यांचा सविस्तर आढावा घेतला. संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीची समान संधी उपलब्ध झाली असून, सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक व्यापक आणि भक्कम झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, लोकशाही ही केवळ मतदानाच्या प्रक्रियेपुरती मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबतच मूलभूत कर्तव्यांचीही सदैव जाणीव ठेवणे काळाची गरज आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही चार प्रमुख तत्त्वे समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत. जात, धर्म, पंथ, भाषा आणि आर्थिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मान देण्याची उच्च शिकवण आपले संविधान देते, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
याप्रसंगी सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते प्रमुख वक्ते क्षितिज गायकवाड यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरपरिषदेचे गटनेते अविनाश कदम, बांधकाम समितीचे सभापती विनोद खंदारे, क्रीडा व शिक्षण समितीचे सभापती शंकर किर्दत, आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे, समरसता मंचाचे प्रांत संयोजक मुकुंद आफळे आणि जिल्हा कार्यवाह महेश शिवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच नितीन शिंगटे, जयदीप ठुसे, संदीप आठल्ये, सारंग कोल्हापुरे, विक्रांत भोसले, उमेश खंडुझोडे, माधव लोहार, सिद्धार्थ खरात, मनोज तपासे यांच्यासह नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनाचा उत्सव केवळ एका दिवसाच्या औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता संविधानाने दिलेल्या मूल्यांचे आचरण प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन कृतीतून करावे, असा मौलिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी प्रशासन मैदानात; जिल्ह्यात दोन दिवस विशेष मोहीम

संबंधित बातम्या