कोरेगाव: शहरालगतच्या एकंबे रस्त्यावरील प्रसिद्ध दुर्गा भोजनालय परिसरातील मेळावणे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगावचे पोलीस पाटील दीपक शिंदे यांना माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दूरध्वनीवरून विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, विहिरीच्या पाण्यात पालथ्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने कोरेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
संबंधित विहीर सुमारे ४० ते ५० फूट खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे महाबळेश्वर येथील ट्रेकर्स आणि रेस्क्यू पथकाची मदत घेण्यात आली. रेस्क्यू पथकाचे संजय पार्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष साधनांचा वापर करून विहिरीत उतरून मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडे मृतदेहाबाबत चौकशी केली, मात्र त्याची ओळख पटू शकली नाही. मृत युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार संबंधित युवकाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून कोरेगाव पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.