फलटण : धुळदेव, ता. फलटण येथे वधू-वर प्रवेश कार्यक्रम सुरू असताना अज्ञात चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद दूध डेअरीजवळ, वनदेव शेरी, पोस्ट धुळदेव, ता. फलटण येथे १० मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही चोरी झाली. घरात मुलाचा वधू-वर प्रवेश कार्यक्रम सुरू असल्याने घरातील सदस्य सोहळ्यात व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कपाटातील दागिने व रोख रक्कम लंपास केली.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मनीमंगळसूत्र,३० हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे डायमंड जडित मनीमंगळसूत्र, २० हजारांचे एक तोळे वजनाची डायमंड जडित सोन्याची चैन आणि ४५ हजार रोख रक्कम असा एकूण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.
याप्रकरणी फिर्यादी महादेव तात्याबा जाधव (वय ६०, रा. राजाळे, ता. फलटण) यांनी तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रणवरे करत आहेत.