सातारा : पोलीस हे समाजाचे प्रतिबिंब असून नागरिक जसे असतील, तसेच पोलीस प्रशासन घडते. त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन करून जिल्ह्यात लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असा ठाम विश्वास साताऱ्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला.
बुधवारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पिंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुमारे वीस महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करत, त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक आणि सामाजिक समस्या भिन्न असतात, याची आपल्याला पूर्ण जाणीव असल्याचे सांगितले. वरिष्ठ पातळीवरून आपल्यावर जो विश्वास टाकून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणा, निपक्षपातीपणा आणि पारदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्या संपूर्ण पोलीस दलाने याच तत्त्वावर काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करणे आणि एकूणच पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख व प्रभावी बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सद्यस्थितीत गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून, त्याचा सखोल अभ्यास करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस धोरण आखले जाईल, असेही पिंगळे यांनी नमूद केले. जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि पोलीस व जनतेतील विश्वासार्हतेचे नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.