पुणे : सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे देण्यात येणार असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक विभागातील १५९ उपविभागांसाठी एकूण २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या योजनेमध्ये प्रत्येक उपविभागासाठी प्रथम – एक स्मार्ट फोन, द्वितीय - दोन स्मार्ट फोन आणि तृतीय बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासोबतच प्रत्येक बक्षिसासाठी दोन विजेत्याची प्रतीक्षा यादी राहणार आहे. संपर्क करूनही विजेत्यांनी १० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास किंवा थकबाकी व इतर कारणांमुळे अपात्र असल्यास प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बक्षिस देण्यात येतील. तसेच ही योजना महावितरणच्या विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे प्रादेशिक विभागात १५९ उपविभाग आहेत. यामध्ये पुणे जिल्हा- ५५, सातारा – २३, सोलापूर- २६, सांगली- २४ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३१ उपविभाग आहेत. या प्रत्येक उपविभागासाठी ५ बक्षिसे आणि एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लकी ड्रॉ असे मिळून तब्बल २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्राहकांना दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅशकार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.
ज्या लघुदाब वीजग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे तसेच दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल किंवा त्याचा ऑनलाइन भरणा केलेला नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे.
दि. १ जानेवारीपासून सुरु झालेल्या या योजनेत येत्या एप्रिल, मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर जाहीर होईल. तसेच संबंधित विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बक्षिस जिंकल्याची माहिती देण्यात येईल. किंवा विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट अधिक माहिती उपलब्ध आहे.