सातारा : मराठी साहित्य, संस्कृती समृद्ध करणारे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट लेखन प्रेरणादिन म्हणून शासनाने व जनतेने पाळावा, असे आवाहन अण्णाभाऊंच्या व कुटुंबीयांच्या सहवासातील डाव्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड सुबोध मोरे यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने थोर साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे होते. विचार मंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते.
सुबोध मोरे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक साम्यवादी विचार लोकापर्यंत जाण्याची गरज आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब डाव्या चळवळीत कार्यरत होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी करण्या साठी अमर शेख, गव्हाणकर, आत्माराम पाटील या शाहिरांच्या बरोबर त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्याचा विसर पडता कामा नये. त्यांची क्रांतिकारक साम्यवादी निष्ठेची ओळख पुसण्याचे काम होत आहे. ते योग्य नाही, अशी खंत सुबोध मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
दिनकर झिंब्रे म्हणाले, अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील पहिले बंडखोर, विद्रोही लेखक आहेत. शंकरराव खरात, बाबुराव बागुल यांच्या प्रमाणेच त्यांनी आंबेडकरी, दलित साहित्याचा पाया घातला. फकिरा सह पस्तीस कादंबर्या, कथा, लोकनाट्य तमाशा, शाहिरी असे उदंड वाङ्मय लिहूनही त्यांची उंची मराठी समीक्षकांना कळली नाही.प्रा.कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेल्या शंभर वर्षाच्या मराठी कादंबरी इतिहासाच्या ग्रंथात त्यांची साधी दखल घेतली गेली नाही. मराठी समीक्षकांनी आपल्याला योग्य न्याय दिला नाही अशी खंत अण्णा भाऊंनी त्यांच्या हयातीतच व्यक्त केली होती.
सातार्यात 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे. या संमेलनात अण्णा भाऊं साठे यांच्या साहित्यातील योगदानाची उचित दखल घेऊन गौरव झाल्यास त्यांना न्याय मिळेल.
डॉ. तानाजीराव देवकुळे यांनी संबोधी प्रतिष्ठानच्या कार्यास भरघोस देणगी दिल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रमेश इंजे यांनी प्रस्ताविक केले. हौसेराव धुमाळ यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यावर केलेले उत्तम गीत यावेळी सादर केले. डॉ. सुवर्णा यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सहकार्यवाह अनिल बनसोडे यांच्यासह विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.