सातारा पालिकेच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची एमपीएससीमध्ये दमदार कामगिरी; यशस्वी विद्यार्थ्यांचा ॲड. डी. जी. बनकर यांच्या हस्ते गौरव

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा :  सातारा पालिकेच्या गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (दादा महाराज) स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. सातत्यपूर्ण मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासिकेतील शैक्षणिक वातावरणाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

या अभ्यासिकेतून तयारी करून विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विवेक चव्हाण (ठाणे शहर पोलीस), राकेश जाधव (कर सहाय्यक व महसूल सहाय्यक), आदिती शिंदे (महसूल सहाय्यक) आणि सुरज भोसले (पुणे शहर पोलीस) यांचा समावेश आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि साधने मिळाल्यास ते मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवू शकतात, असे मत व्यक्त केले. तसेच भविष्यात ही अभ्यासिका अधिक अद्ययावत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगताना अभ्यासिकेतील पोषक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. भविष्यात प्रशासकीय सेवेत कार्य करताना सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या प्रसंगी श्रद्धा नांदुगडे, सुमित बनकर, प्रतीक्षा गुरव, प्रांजली माने, वैभव साळुंखे यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल खासदार उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फोटो ओळ:

सातारा : पालिका अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर व मान्यवर.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाणीटंचाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : आमदार शशिकांत शिंदे यांचे निर्देश, कोरेगाव पंचायत समिती सभागृहात बैठक
पुढील बातमी
ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी शाहू कलामंदिर येथे परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन

संबंधित बातम्या