सातारा : ‘पोलीस तपास सुरू आहे’, गांजा विकणारा संशयित परिसरात फिरत आहे’ असे सांगत एका भामट्याने 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेतले आणि तपासणीच्या बहाण्याने तब्बल 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोन्याची चेन, अंगठी आणि रोख दहा हजार रुपये असा ऐवज घेऊन संशयित दुचाकीवरून पसार झाला. भरदिवसा गर्दीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे वाई शहरात खळबळ उडाली आहे.
श्रीकांत केशव तिवाटणे (वय 77, रा. रामडोह आळी, वाई) हे सोमवारी (दि. 14) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुस्तकाच्या दुकानाकडे पायी जात होते. पी. आर. चौकातील काका चायनीज दुकानासमोर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडविले. आपण खासगी वेशातील पोलीस असल्याचे सांगत परिसरात गांजा विकणार्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे त्याने तिवाटणे यांना सांगितले.
तपासणीचा बनाव करत त्याने तिवाटणे यांच्या जवळील वस्तू बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याची अंगठी आणि रोख दहा हजार रुपये रुमालात ठेवण्यास सांगितले. त्याने स्वतःच त्या रुमालाला गाठ मारून तो तिवाटणे यांच्या खिशात ठेवला.
काही वेळाने तिवाटणे यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत संशयित दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला होता. या प्रकरणी तिवाटणे यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भोईर पुढील तपास करीत आहेत.
पोलीस असल्याचे सांगून वाई शहरात वृद्धाची फसवणूक; 82 हजारांचा ऐवज घेऊन भामटा पसार
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा