सातारा : विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागावी, त्यांच्यामध्ये कौशल्य आणि कल्पकता निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठामध्ये अविष्कार संशोधन स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेसाठी विद्यार्थी तयार व्हावेत हे उद्दिष्ट समोर ठेवून महाविद्यालय स्तरावर अशी स्पर्धा आयोजित करणे हे कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संशोधक विद्यार्थी नवनवीन विषयावर अभ्यासपूर्ण संशोधन करून सादरीकरण करतात. त्यातून त्यांच्यात सृजनशीलता वाढते आणि त्यांना समाजाच्या अनेक समस्यांवर उत्तरे शोधण्याची सवय लागते. त्याचबरोबर जिज्ञासा वाढून संशोधन वृत्तीला चालना मिळते. असे उदगार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे प्राचार्य. डॉ.आर.आर.कुंभार यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते प्रमुख उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड हे होते.
प्राचार्य डॉ.आर.आर. कुंभार आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संशोधक विद्यार्थी व परीक्षक यांच्याशी स्पर्धेदरम्यान होणारा संवाद तसेच तज्ज्ञांचे होणारे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन विचार क्षमतेमध्ये सखोलता निर्माण होते. म्हणून विद्यार्थ्यांनी सूचनांचे लक्ष पूर्ण आकलन करावे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास अविष्कार संशोधन स्पर्धा उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक विचार व्यवहारतेच्या पातळीवर तपासून पाहण्याची संधी आविष्कारमुळे निर्माण झालेल्या व्यासपीठामुळे मिळाली. त्याचा उपयोग करून आत्मविश्वासाने सादरीकरण करावे.
महाविद्यालयीन स्तरावरील अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये 14 विद्यार्थ्यांनी विविध विषयावर अभ्यासपूर्ण संशोधन करून सादरीकरण केले. कु. साक्षी कदम हिच्या "ग्रामपंचायत मधील महिलांचे आरक्षण आणि महिलांचे राजकीय सक्षमीकरण: एक मूल्यमापन " या संशोधन प्रकल्पास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. कु प्रतिक्षा देशमुख हिच्या "Temple Flower Waste Management and Reuse" या संशोधन प्रकल्पास द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक कु.लक्ष्मी सपकाळ हिच्या " उच्चशिक्षित विवाहितातील वाढता घटस्फोटाचा कल: एक अभ्यास
संशोधन प्रकल्पास मिळाला. यशस्वी स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.पी पी लोहार (एल. बी. एस. कॉलेज सातारा) अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजाराम कांबळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. संदीप लोखंडे , राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. नागनाथ चोबे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अविष्कार संशोधन स्पर्धा प्रमुख डॉ. अजितकुमार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.जयमाला उथळे यांनी केले. तर आभार डॉ.नागनाथ चोबे यांनी मानले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी - विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.