सातारा : सातारा शाहुनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूल विद्यार्थांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहारिक व आर्थिक ज्ञानाच्या विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. गुरूकुल स्कूलच्या वतीने, विद्यार्थी दशेत मुलांना व्यवसायाची, व्यवहारी जीवनाची ओळख व आवड निर्माण व्हावी व कौशल्यविकास गुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच कै. रतनजी टाटा यांना आदरांजली म्हणून ‘एम्पॉवरिंग यंग इंटरप्रीनर्स’ (तरुण उद्योजकांचे सक्षमीकरण) हा एक नाविण्यपुर्ण उपक्रम स्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आला होता.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सातारा येथील आकाशगंगा उद्योग समुहाचे संचालक सचिन कालाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, डॉ.सौ.राजश्री ठोके, कु. ऐश्वर्या चोरगे, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ.सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘एम्पॉवरिंग यंग इंटरप्रीनर्स’ या उपक्रमांतर्गत शालेय जीवनात विद्यार्थ्यांने स्वनिर्मित वस्तू तयार करुन त्या वस्तूंचे विक्री कौशल्य शिकणे, तसेच भविष्यात स्वत:चा उद्योग उभारण्यास प्रोत्साहन व रोजगार निर्मिती करणे, हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
‘एम्पॉवरिंग यंग इंटरप्रीनर्स’ या उपक्रमात इयत्ता 5 वी ते 9 वी च्या निवडक 70 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला होता. विद्यार्थ्यांना दिपावली सुट्टी सुरु होण्याआगोदर या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली होती. सुट्टी नंतर शाळा सुरु झाल्यावर प्राथमिक स्वरुपात तयार केलेल्या नाविण्यपूर्ण व नैसर्गिक समतोल साधणार्या वस्तू वेस्ट ऑफ बेस्ट निर्माण करणार्या 70 विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शेल किचन, बॉटल व नॅपकीन पेंटिग, ब्रेसलेट, वारली पेटिंग, साबण, राजमुद्रा, चॉकलेट, मोबाईल चार्जर, बर्ड हाऊस, सेंद्रीय धूप, सिंदूर, परफ्यूम, बांबू निर्मित वस्तू इत्यादी 50 प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता. या एक दिवसीय प्रर्दशनात अंदाजे दोन हजार वस्तूंची विक्री व दोन लाखांच्या वर उलाढाल झाली.
यावेळी सचिन कालाणी म्हणाले, शालेय वयात विद्यार्थ्यानी तयार केलेल्या वस्तू नाविन्यपूर्ण असून विद्यार्थी वस्तूचे उत्पादन करुन विकतही आहेत. यामुळे हे विद्यार्थी भविष्यातील उद्योजक बनतील व भविष्यात विद्यार्थ्यांनो, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांंचे विद्यार्थ्यांच्या सवार्ंंगिण विकासासाठी बारकाईने लक्ष आहे.
तसेच राजेंद्र चोरगे म्हणाले, विज्ञान दिनाचे औचित्य साधून 70 विद्यार्थ्यानी तयार केलेल्या वस्तू, त्यांचे विक्री कौशल्य, आर्थिक साक्षरता, मार्केटिंग स्किल या सर्व गोष्टी विद्यार्थ्याना या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिकता आल्या. हे या उपक्रमाचे पहिलेच वर्ष आहे. यावेळी उपस्थित डॉ. सौ. राजश्री ठोके यांनीही मनोगत व्यक्त केले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गुरूकुल स्कूलच्या योग प्रशिक्षिका सौ. निलिमा खांडके, सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सॅटर्डे क्लब व इनरव्हिल क्लब चे पदाधिकारी, दैनिक प्रभातचे आवृत्ती प्रमुख श्रीकांत कात्रे, अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदिश खंडेलवाल, हरिदास साळुंखे उपस्थित होते.