सातारा : जमीन खरेदीनंतर सातबारावर नाव लावून देण्यासाठी 1000 रुपयांची लाच मागून त्यापैकी 500 रुपये स्वीकारताना दिपक दौलतराव उदंडे (वय 49, रा. फलटण) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ (ट्रॅप) पकडले. उदंडे हा फलटणचा कोतवाल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांनी दीड गुंठे जागा खरेदी केली आहे. त्या जागेची सातबारा नोंद त्यांना करायची होती. यासाठी ते फलटण ग्रामपंचायतीमध्ये गेले. तेथे दिपक उदंडे भेटले असता त्यांनी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी सातारा एसीबीकडे तक्रार केली. पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती 500 रुपये घेण्याचे ठरल्यानंतर सातारा एसीबीने सापळा लावला. लाचेची रक्कम घेताना सातारा एसीबीने उदंडे याला रंगेहाथ पकडले. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.