सातारा : उरमोडी डावा कालव्यामध्ये डबेवाडी, जकातवाडी आणि शहापूर येथील 65 खातेदारांच्या जमिनी गेल्या आहेत. या जमिनीचा मोबदला गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांना मिळालेला नाही. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की सिंचन विभागाने उरमोडी धरण डाव्या कालव्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी जागा संपादन केल्या होत्या. परंतु तीन वेळा कॅनॉलची कामे पूर्ण करण्यात आली. शेतकर्यांनी मात्र वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेतला जावा. पंधरा ऑगस्ट पूर्वी या प्रकल्पग्रस्तांना पैसे मिळाले नाहीत तर सिंचन भवन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन सादर करताना सचिन मोहिते, सागर रायते, रुपेश वंजारी, मधुकर माने, सरपंच शिवाजी माने, विकास माने, विजय दिवाकर, सूर्या देवकर इत्यादी उपस्थित होते.