सातारा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने दि. 22 जूलै रोजी पंचायत समिती, सातारा येथे मिशन वात्सल्य अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनानुसार पार पडलेल्या या कायशाळेस सातारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी साताराचे आनंद खंडागळे, पंचायत समिती, सातारा गटविकास अधिकारी सतीश बुद्दे, अॅड. सुचित्रा घोगरे काटकर, अध्यक्षा बालकल्याण समिती, सातारा, अॅड. योगेंद्र सातपुते, सदस्य माजी बालकल्याण समिती, सातारा उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २०२२ मधील कलम १३ नुसार मनाई आदेश घेण्याबाबतची भूमिका व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करुन उपस्थित ग्रामसेवकांच्या समस्यांचे समाधान केले. उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज समजावून सांगण्यात आले. योगेंद्र सातपुते यांनी बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमन २०१५ या कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अॅड. सुचित्रा घोगरे-काटकर यांनी बालविवाह विषयी विस्तृत माहिती दिली तसेच गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी ग्रामसेवकांच्यावतीने सातारा तालुका बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत मोरे, केंद्र समन्वयक, चाईल्ड हेल्पलाईन, सातारा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुजाता देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.