कराड : अन्न व औषध प्रशासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त तक्रारींची दखल घेत कराड शहरातील विविध हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक धाडी टाकून धडक तपासणी मोहीम राबवली.
या कारवाई दरम्यान दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य थंड पेयांची सर्रास विक्री होत असल्याचे आणि काही अत्यंत संशयास्पद खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचे उघडकीस आले. अन्न सुरक्षेच्या नियमांचे तीव्र उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने ही दोन्ही हॉटेल्स पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ बंद ठेवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. याच मोहिमेत नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या अन्य तीन हॉटेल्सवरही दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सातारा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिला आहे.