तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 25 August 2024


सातारा : सातारा येथे तरुणाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित युवकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, संबंधित युवकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुलीच्या नातेवाईकांसह काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर रस्ता रोको केला. घटनास्थळी धाव घेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा येथे एकतर्फी प्रेमातून एक तरुण सतत एका अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. यापूर्वी याच प्रकरणातून संबंधितावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याने जेलची हवाही खाल्ली होती. मात्र त्यानंतर जेलच्या बाहेर पडल्यावरही तो संबंधित मुलीशी संपर्क ठेवून होता. त्यातून त्या दोघांमध्ये वारंवार भांडणेही झाली होती. काही दिवसापुर्वी तो जामिनावर सुटला होता. हे कळताच तो पुन्हा त्रास देईल या भीतीने मुलगी व तिची आई गोंदवले येथे मामाच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. 
सरतेशेवटी शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केली. घटना घडल्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांसह काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पोवई नाक्यावर रस्ता रोको, घोषणाबाजी करीत संबंधित युवकावर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी वाहतूक कोंडी होवून काही काळासाठी तणावाचे वातावरण झाले होते. सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, राखीव पोलीस दल यांनी तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितावर कठोर कारवाईचे आश्‍वासन दिल्याने हा रस्ता रोको मागे घेण्यात आला. यानंतर दहिवडी पोलीस ठाण्यात संबंधित युवकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दहिवडी पोलिसांनी तस्लीम मोहम्मद खान (रा. रविवार पेठ, सातारा) याला सांगली हून अटक केली आहे.

सहा तास तणावाचे वातावरण...

पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास माहुली येथे नेहण्यापासून ते पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी झालेल्या चर्चेच्या घडामोडी तब्बल सहा तास चालल्या. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश, नराधमास फाशी देण्याच्या घोषणा किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या घोषणा यामुळे सुमारे सहा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जयंत पाटील यांनी घेतली मदन भोसले यांची भेट
पुढील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता

संबंधित बातम्या