म्हसवड : विरळी येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ झालेल्या दरोड्याचा अवघ्या चार तासांत म्हसवड पोलिसांनी छडा लावून लुटलेला 5 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त केला व सहा सराईत दरोडेखोरांना अटक केली आहे.
विजय बाबा शिंदे, समाधान सिदा गोरड, प्रवीण सुरेश गोरड, करण नवनाथ गोरड, विशाल महादेव नलवडे, अक्षय महादेव गोरड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दरोड्यात दरोडेखोरांनी वापरलेली पिस्तूल, तलवारी, कोयते, वाहने आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.
या दरोड्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 20 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9.45 च्या सुमारास नागेश मोहन दीडवाघ (रा. दीडवाघवाडी) हे त्यांच्या मित्र आणि सासर्यासोबत जेवण करून परतत असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या 6-7 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड, तलवार, कोयता आणि पिस्तूल दाखवून त्यांनी सोन्याच्या चैन्स व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या घटनेची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे अवघ्या चार तासांत सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने आणि लुटलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून याआधीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर, सुभाष भोसले, भगवान सजगणे, नवनाथ शिरकुळे, श्रीकांत सुद्रिक, अभिजीत भादुले, सतीश जाधव, महावीर कोकरे यांनी सहभाग घेतला.