स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) – कोणत्याही प्रकारचा तोचतोचपणा आणि एकरेषीय विचार मला आवडत नाहीत. विविध माध्यमांतून, आयामांतून स्वतःला सतत पडताळून आणि तपासून पाहणे, हे मला माणूस आणि कलावंत म्हणूनही सजगपणाचे वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक अमोल पालेकर यांनी केले.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ३) सायंकाळी अमोल पालेकर लिखित 'ऐवज – एक स्मृतिगंध' या पुस्तकावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत पालेकर यांच्यासह संध्या गोखले यांचाही सहभाग होता. वृंदा भार्गवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.
पालेकर म्हणाले, तपशिलांमध्ये न अडकता रोचक पद्धतीने आत्मकथन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मकथनात आत्मगौरव होण्याचा संभव असतो, तो जाणीवपूर्वक टाळला आहे. हे स्मरणरंजन नक्कीच आहे, पण तेवढेच नाही. मागे वळून पाहताना आपल्या काय चुका झाल्या, काय सुधारणा हव्या होत्या, याचे आकलन व्हावे, असाही प्रयत्न होता. आपल्या आठवणी तपासल्या जाव्यात, ही भूमिका होती.
ते पुढे म्हणाले, आस्तिकपणाच्या कोणत्याच छटा मी मानत नाही, त्यामुळे माझ्या बाबतीत घडलेल्या, बिघडलेल्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार राहतो. असे जगणे सोपे नसते. आपले आयुष्य आपल्याच तळहातावर घेत तोलत तपासत राहावे लागते. आत्मकथन आत्मगौरवापासून दूर ठेवणे आणि आपण आपल्याच जगण्याकडे तटस्थपणे, दूरस्थपणे पाहणे, असा प्रयत्न ऐवजच्या लेखनातून केला. ठिकठिकाणी आधुनिक जगाशी नाते जोडणारे क्यूआर कोड यासाठी दिले आहेत, ज्यायोगे तरुण वाचकांनाही मी जगलेल्या काळाशी, कलाकृतींशी जोडून घेता यावे. मी रंगभूमी, प्रायोगिक व समांतर कलाप्रवाह, चित्रपट, लघुपट, चित्रकला, संगीतकला अनेक कलाप्रकारांमध्ये रमलो, काम केले. व्यावसायिक यश मिळवले, पण तिथेच न थांबता टाईपकास्ट होणे टाळले. मी नायक म्हणून लोकप्रिय, यशस्वी असतानाच, मी स्वतःला खलनायक म्हणूनही आजमावून पाहिले.
माध्यमांतर करताना मी दिग्दर्शक म्हणून त्या त्या माध्यमांची बलस्थाने आणि मर्यादांचा सखोल विचार केला. साहित्यकृतीचे नाटक वा चित्रपटात माध्यमांतर करताना, मी बदल नक्कीच केले, पण ते कथेशी, आशयाशी प्रामाणिक राहून केले, हे सांगताना पालेकरांनी बनगरवाडी, कैरी या माध्यमांतरांची उदाहरणे दिली.
संध्या गोखले म्हणाल्या, पालेकरांना स्वतःचे, चित्रपट – नाटकांच्या प्रमोशन तसेच पब्लिसिटीचे काम जमत नाही. पण त्या गोष्टी गरजेच्या आहेत, हे पटते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा ठहराव आहे. समजूतदारपणाही आहे. त्यांना बाळबोध, सरधोपट असे काही करायला आवडत नाही. आव्हान स्वीकारावे, पेलून दाखवावे, यात त्यांना रस वाटतो. त्यांच्यातील अमूर्ततेवर प्रेम करणारा चित्रकारही याला अपवाद नाही. ऐवज या पुस्तकातील कविता ऐकवून पालेकर यांनी समारोप केला.