नवी दिल्ली : ‘मतचोरी’च्या आरोपांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांचे म्हणणे नाकारले नाही, तर पुरावे सादर करण्यास सांगितले, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत ‘इंडिया’ आघाडीच्या दहा नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी विरोधकांनी मतदार याद्यांमधील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित केला.
‘इंडिया’ आघाडीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना निवेदन सादर करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मतदार याद्यांमध्ये फेरफार होत असून, विविध निवडणुकांमध्ये मतांची चोरी केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांनी मतचोरीचा मुद्दा मांडल्यानंतर राष्ट्रपतींनी तो नाकारला नाही, तर त्यासंदर्भातील पुरावे मागितले, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित पुरावे राष्ट्रपतींसमोर सादर केले जातील, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
मोदी, शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर राहुल गांधींचे आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय लोकशाहीविरोधात काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये फेरफार झाल्याची जनतेला जाणीव असल्याचे सांगत, मोदी आणि शाह लोकशाही कमकुवत करत असून ज्ञानेश कुमार मतांची चोरी करण्यास मदत करत असल्याचा दावाही त्यांनी केला. राष्ट्रपतींनी या प्रकरणाचा विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच, सोमवारी भारताच्या सरन्यायाधीशांचीभेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खर्गे यांची बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राष्ट्रपतींसमोर मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले. निवडणुकांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडणुका घेण्याची आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदानाची पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. राष्ट्रपतींनी विरोधकांना आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यास सांगितल्याचे खर्गे यांनीही स्पष्ट केले.
राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे; राहुल गांधींचा मोठा दावा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी
by Team Satara Today | published on : 09 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा