बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजे, चाहत्यांचा लाडका संजू बाबा. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा संजय दत्त इंडस्ट्रीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. कॉमेडी चित्रपट असो किंवा रोमँटिक, अॅक्शन किंवा मग थ्रीलर, चित्रपटाला आपल्या दमदार अभिनयानं संजू बाबा चार चाँद लावतो. अगदी पदार्पणापासून ते आजतागायत संजय दत्तचे अनेक चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी वेडेपिसे होतात. याचंच एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर, 2018 मध्ये एका महिला चाहतीनं तिच्या मृत्यूनंतर तिची तब्बल 72 कोटींची प्रॉपर्टी संजू बाबाच्या नावावर केली होती.
ज्यावेळी हे वृत्त समोर आलं, त्यावेळी काहींनी ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं. तर काहींना हे ऐकून मोठा धक्का बसलेला. पण, काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत बोलताना संजय दत्तनं ती माहिती खरी असल्याचं सांगितलं. त्यासोबतच त्यानं, त्या मालमत्तेचं काय केलं? हेसुद्धा सांगितलं.
कर्ली टेल्सशी बोलताना संजय दत्तनं सांगितलं की, 2018 मध्ये त्याची चाहती निशा पाटील खूप आजारी होती आणि त्या आजारपणातच तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूपूर्वी निशानं तिची तब्बल 72 कोटी रुपयांची सर्व मालमत्ता संजय दत्तला हस्तांतरित केली होती. निशा मुंबईची रहिवाशी होती आणि ती 62 वर्षांची होती. तिनं तिच्या बँकेला सांगितलं होतं की, तिच्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता संजय दत्तला देण्यात यावी.
संजय दत्तनं बोलताना सांगितलं की, त्यानं ती सर्व मालमत्ता तिच्या कुटुंबाला परत केली. चाहत्यांना संजू बाबानं उचललेलं पाऊल खूप भावलं.
संजय दत्तच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 1981 मध्ये रॉकी या चित्रपटातून पदार्पण केलं. संजय दत्तनं इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं. त्याने नाम, साजन, खलनायक, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई सारखे चित्रपट केले. या वर्षी संजय दत्त भूतनी आणि हाऊसफुल 5 सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.
2018 मध्ये संजय दत्तची चाहती निशा पाटीलनं सुमारे 72 कोटी रुपयांची तिची संपूर्ण मालमत्ता, अभिनेता संजय दत्तला हस्तांतरित केली. निशा ही मुंबईत राहणारी 62 वर्षांची गृहिणी होती. असं म्हटलं जातं की, ती बऱ्याच काळापासून एका आजाराशी झुंज देत होती आणि तिच्या मृत्यूपूर्वी तिनं तिच्या बँकेला कळवलं होतं की, तिच्या मृत्यूनंतर तिची सर्व मालमत्ता संजय दत्तला हस्तांतरित करावी.