ड्रग्ज माफियांचा साताऱ्यात शिरकाव

राजकीय इच्छाशक्ती आणि पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी

by Team Satara Today | published on : 15 December 2025


सातारा : मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने जावली तालुक्यातील सावरी गावात छापा टाकून तब्बल ११५ कोटी रुपयांचा एम.डी. ड्रग्जचा साठा आणि कारखाना उध्वस्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. शांत आणि संयमी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात ड्रग्ज माफियांनी पाय रोवल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईने स्थानिक यंत्रणेला एक प्रकारे सावध राहण्याचा इशाराच दिला आहे.

स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यासारख्या विचारवंतांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याची ओळख ही 'मराठ्यांची राजधानी' आणि 'पेन्शनरांचे गाव' अशी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या ओळखीला बट्टा लागतोय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकेकाळी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या साताऱ्यात अवैध धंदे, जुगार आणि आता थेट ड्रग्जचे कारखाने सापडू लागल्याने जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​जिल्ह्यात यापूर्वी मीरा बोरवणकर, के.एम.एम प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख,संदीप पाटील, तेजस्वी सातपुते  यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवला होता. मात्र, जावलीसारख्या दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा कारखाना सुरू असताना त्याची कुणकुण स्थानिक पातळीवर लागू नये, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे. मुंबई क्राईम ब्रँचला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई झाली, यावरून स्थानिक खबऱ्यांचे नेटवर्क आणि बीट लेव्हलची गस्त अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. हा पोलिसांवरील आरोप नसून, भविष्यातील मोठ्या धोक्याची ही 'घंटा' आहे, असेच म्हणावे लागेल.

उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याकडून अपेक्षा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असतानाच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या गावाजवळच ड्रग्स तयार करण्याचे रॅकेट सापडल्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा हे केवळ त्यांचे गाव नाही, तर राज्याच्या सत्तेचे केंद्रबिंदू असलेल्या नेत्याचा हा जिल्हा आहे. त्यामुळे येथील प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक असावे, अशी सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे.

पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज 

जावली तालुक्यात ड्रग्ज कारखान्यावर कारवाई केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जणांना अटक केली असून या प्रकरणातील अन्य संशयितांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुणे शाखेची विशेष मोहीम राबविली आहे. हे प्रकरण मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतले असताना सातारा पोलिसांनी आता सतर्क राहण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.

अजितदादांच्या 'शिस्ती'ची आठवण

या घटनेच्या निमित्ताने सातारकरांना पुन्हा एकदा माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळाची आठवण होत आहे. त्यांचा प्रशासनावरील वचक आणि निर्णयातील स्पष्टता यामुळे यंत्रणा नेहमीच सतर्क असायची. आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीच्या प्रशासकीय धाकाची आणि राजकीय पाठबळाची जिल्ह्याला गरज आहे, जेणेकरून साताऱ्यात पुन्हा असे उद्योग करण्याचे धाडस गुन्हेगार करणार नाहीत.

​तरुणाईला वाचवणे हेच आव्हान..

गांजा, व्हायटनर आणि आता एम.डी. सारखे अमली पदार्थ साताऱ्याच्या उंबरठ्यावर आले आहेत. महाविद्यालयीन तरुण या विळख्यात अडकण्याआधीच हे रॅकेट मुळासकट उखडून टाकण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा पोलीस दलासमोर आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईने एक दिशा मिळाली आहे, आता त्या दिशेने स्थानिक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवावीत, हीच जिल्ह्यातील सामान्य लोकांची अपेक्षा आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या 'शरद पवार आणि पुलोदचा प्रयोग' या पुस्तकाचे प्रकाशन
पुढील बातमी
सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव येथे कुस्त्यांचा महासंग्राम

संबंधित बातम्या