कृषी सहाय्यकांच्या संपामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कामे ठप्प

by Team Satara Today | published on : 14 May 2025


कराड : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यासाठी काही दिवस राहिल्याने शेतकरी शेतीची मशागत, बियाणे, खत खरेदीच्या तयारीत आहेत. त्यातच कृषी सहाय्यकांनी ऐन खरिपाच्या मोक्यातच त्यांच्या मागण्यांसाठी कामबंदचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावरच शेतीविषयक सल्लाच मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. संपामुळे कृषी सहाय्यकांनी ऑनलाइनच्या कामावरही बहिष्कार टाकल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाच्या योजनांचाही फटका बसणार आहे.

कृषिसेवक कालावधी रद्द करून कृषिसेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करावे, कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही, तो देण्यात यावा, कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावे, निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देऊनही त्यात सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी, निविष्ठा वाटप परवान्याद्वारे करावे, कृषी विभागाच्या आकृतिबंधास तत्काळ मंजुरी द्यावी, त्यामध्ये कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दूर करावी, महसूल विभागाप्रमाणे आकृतिबंध करावा, कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षकांचे प्रमाण चारास एक असे करावे, पोकरा योजनेमध्ये समूह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी, आदी मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलनाचे पाऊल उचलले आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या यांत्रिकीकरणाच्या लाभासाठी आवश्यक असणारी कृषी सहाय्यकांची तपासणी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न खाद्यप्रक्रिया उद्योगासाठी भरायच्या ऑनलाइन अर्जाविषयीचे मार्गदर्शन, शेतीशाळेची माहिती ऑनलाइन भरणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ग्रीन हाऊस, पॅक हाऊस, इतर कृषी प्रक्रिया उद्योग, शेततळे, फलोत्पादन पिकाचे अर्ज भरण्यासाठी मिळणारे मार्गदर्शन, तुषार आणि ठिबक सिंचनाचा अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया, पीएम किसान आणि नमो किसान योजनेंतर्गत भरलेल्या ऑनलाइन अर्ज प्राप्त करणे, त्याची पडताळणी करण्यासाठीचे मार्गदर्शन, पिकाच्या उत्पन्नाची आकडेवारी तसेच पिकांच्या उत्पादनाची सरासरी ऑनलाइन भरणे, शेतकऱ्याच्या शेतातील मातीचे नमुने काढून त्याची माहिती ऑनलाइन भरणे यासह कृषी विभागाची इतर ऑनलाइन कामेही ठप्प झाली आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य
पुढील बातमी
चुकून पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान 20 दिवसानंतर भारतात परतला

संबंधित बातम्या