शिखर शिंगणापूर : माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायतराज मंत्रीपद मिळाल्यानंतर माण - खटावमध्ये जल्लोष झाला आहे. त्यानंतर शेखर गोरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही झाले आहेत. शेखर गोरे यांच्या आमदारकीसाठी मंगळवारी कार्यकर्त्यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला अभिषेक करून साकडे घातले.
विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे व शेखर गोरे या दोघा भावांमध्ये मनोमीलन झाले. यावेळी भाजपच्यावतीने निवडणुकीनंतर शेखर गोरे यांना विधानपरिषदेवर घेण्याचे सांगण्यात आले होते. शेखर गोरे हे विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्यासाठी मोठ्या ताकतीने प्रचारात उतरले होते. यामुळे आता शेखर गोरे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी द्यावी. अशी सामान्य कार्यकर्त्यांचीही मनापासून इच्छा आहे. ना. जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर शेखर गोरे यांनाही आमदारकी मिळावी, अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यासाठी या कार्यकर्त्यांनी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक करून साकडे घातले. विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. शेखर गोरे यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप पूर्ण करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राजेंद्र जाधव, धनाजी माने, पूनम माने, वैभव मोरे, सागर गुरव, दत्ता घाडगे, सुनील जाधव, शंकर तांबवे, शैलेश बडवे, अनिल बडवे, रवी मदने, गणेश चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.