सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या ऊसदराच्या संघर्षाला अखेर पहिले यश मिळाले आहे. कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर लि. कारखान्याने प्रतिटन ३ हजार ९०० रुपये पहिली उचल जाहीर करून जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकजुटीला मिळालेले हे यश असल्याची भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दर जाहीर होताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी (दि. १६) तिसरा दिवस होता. रविवारी रात्रीपासून सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध भागांत आंदोलनाची धग कायम होती. शिवथर, रहिमतपूर, जरंडेश्वर, औंध घाटमाथा, इंदोली, वाठार किरोली, पिंपरी यांसह कराड तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करून ऊसदराच्या प्रश्नाकडे कारखानदार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी शुगरने प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्याने ऊसदराच्या लढयाला निर्णायक वळण मिळाले आहे. एका कारखान्याने पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांवरही दर जाहीर करण्यासाठी दबाव वाढला आहे. इतर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शिवनेरी शुगरच्या धर्तीवर योग्य दर जाहीर करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केले.
दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्यांनी येत्या पाच दिवसांत प्रतिटन ऊसदर जाहीर करावा, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. या मुदतीत कारखानदारांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजू शेळके यांनी दिला.
शिवनेरी शुगरच्या ३,९०० रुपयांच्या पहिल्या उचलीमुळे जिल्ह्यातील ऊसदराच्या संघर्षाला नवी दिशा मिळाली असली, तरी लढा अद्याप संपलेला नाही. इतर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याची भूमिका संघटनेने घेतलेली नाही. त्यामुळे आगामी पाच दिवसांत जिल्ह्यातील साखर कारखानदार काय निर्णय घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एका कारखान्याने कोंडी फोडल्यानंतर आता उर्वरित कारखानदारही शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देणार का ? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अखेर जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली; शिवनेरी शुगर कारखान्याची प्रतिटन ३,९०० रुपयांची पहिली उचल जाहीर
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा