शाश्वत शेतीसाठी फार्मर कप स्पर्धा हा प्रेरणास्त्रोत : श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले

by Team Satara Today | published on : 12 April 2025


गोडोली : उत्पन्न वाढविण्याच्या नादात शेती, फळबागांवर मानवाला घातक ठरणाऱ्या रासायनिक औषधे, खतांचा वापर करु नका. यातून जीवघेणे आजार होत असल्याने विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी शाश्वत शेतीसाठी आवश्यक ज्ञान, तंत्रज्ञान, जैविक वापर हा पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पॅटर्न आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकरी गटांना याचे महत्व समजले आहे. शेतीसाठी एकत्र आलेल्या महिलांना ज्ञान आणि पाठबळ दिले, तर कृषी क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून प्रगती काय असते, फार्मर कप या स्पर्धेत दाखवून दिले. शाश्वत शेतीसाठी फार्मर कप स्पर्धा हा प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी केले.

२०२४ वर्षातील पाणी फाऊंडेशनने राबविलेल्या फार्मर कप स्पर्धेत राज्यभरातील ४६  तालुक्यातील ४३००  पेक्षा शेतकरी गट पैकी यात २ हजारपेक्षा अधिक महिलांचे गट होते. सातारा जिल्हयातील माण,खटाव, कोरेगाव तालुक्यातील ४५० हून अधिक शेतकरी गटांना सहभाग घेतला होता. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत भोसरे येथील सर सेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तर सीतामाई महिला गट कुळकजाई, महालक्ष्मी महिला गट पिंपरी, सुयोग गट पांगरखेल, गोपालनाथ गट भांडवली, श्रीराम गट कुळकजाई, कृषी कन्या गट धकटवाडी, उंच भरारी गट वडगाव, जीद्द गट जांब बु, महालक्ष्मी गट देऊर, कृषकन्या गट आसनगाव यशवंत गट पिंपरी तर १९ वर्षांची युवा शेतकरी निशिगंधा सातपुते यांनीफार्मर कपमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली.

गोडोली येथील श्री. छ. प्रतापसिंहराजे भोसले आयुर्वेदीक गार्डनच्या सभागृहात सर्वांना छत्रपती दमयंतीराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जि.प.चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, डॉ. अविनाश पोळ यांच्या हस्ते तिन्ही तालुक्यातील शेतकरी गटांना सन्मानित करण्यात आले. यावेळी गटांनीसांगितलेली अनुभवाची यशोगाथा थक्क करणारी ठरली. 

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी, " निसर्ग वाचविण्यासाठी केलेल्या कार्यात सर्वोत्तम योगदान देणारी पाणी फाऊंडेशन ही जनचळवळ जगातील प्रथम क्रमांकाची असल्याचे जगभरातील तज्ञांनी मान्य केले आहे. पाण्याची आणि खर्चाची बचत, नवनविन संशोधनाचा वापर, परिपुर्ण ज्ञानाचा आधार, जैविक तंत्रज्ञानाचा वापर करत गट शेती करणारा पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा जनतेने स्विकारलेली आहे. आता फार्मर कपच्या माध्यमातून महाराष्ट्रात शाश्वत आणि विषमुक्त शेतीसाठी क्रांतीकारक बदल घडणार आहे. या कामासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत असेल हा विश्वास दिला.

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी शेतीचे नुकसान कर्जाचा ताण घेऊन पुरूषशेतकरी आत्महत्या करतात. मात्र त्याच शेतकऱ्याची पत्नी त्याच्या पश्चात तोच संसार करते. पण कर्जाचा, नुकसानीचा ताण घेवून राज्यात महिला शेतकरी आत्महत्या न करता परिस्थितीला सामोरे जातात. गटशेतीतून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न वाढविण्यासाठी ज्ञान, कौशल्य, आनंद देणारी फार्मर कप स्पर्धा आता सातारा जिल्हयात यशस्वी करू या," असे आवाहन केले.

डॉ. अविनाश पोळ यांनी, " भविष्यात जल संकट येण्या आधी प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा वापर योग्य आणि काटकसरीने केला पाहिजे. पाणी फाऊंडेशनने पाणी, शेती, निसर्गासाठी जे काम करायचे तेलोकसहभागातून आत्मीयतेने, प्रेमाने, आनंदाने, तळमळीने करायचे, हेच शिकवले. पृथ्वी वाचविण्यात जगभरात होत असलेल्या कार्यात प्रथम क्रमांकवर आज पाणी फाऊंडेशन आहे. आता महाराष्ट्रात फार्मर कप ही स्पर्धा होणार असून गट शेतीतून उत्पादन आणि नफा वाढविण्यासाठी काम केले जाणार," असल्याचे सांगून फार्मर कपच्या कार्याची महती विषद केली.

सुत्रसंचलन प्रिया गमरे तर आभार पाणी फाऊंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सुखदेव भोसलेयांनी मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर, प्रजापिता ब्रम्हकुमारी स्वयंसेवक, विविधगावातील शेतकरी अधिकारी पाणी फाऊंडेशनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा
पुढील बातमी
स्टँड अप इंडीया मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न

संबंधित बातम्या