वाठार स्टेशन : वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे एसटी चालकाला रस्ता न दिल्याच्या कारणावरून लाकडी काठीने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात सहा जणांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार, दि. २१ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दहिवडी ते मुंबईकडे जाणारी एसटी बस क्रमांक (एमएच १४ एलएक्स ५३३४) या एसटीला वाठार गाव ते विखळे फाटा या रस्त्यावर एर्टिगा (एमएच ०८ एएच ०६३५) ही कार एसटीच्या पुढे निघाली होती. एसटी ड्रायव्हर कारला ओव्हरटेक करताना ईरटीका कारने एसटी बसला वारंवार अडथळा निर्माण केला.
चालकाने हॉर्न देत रस्ता मागितल्याचा राग मनात धरून संशयितांनी एसटी चालक विशाल सुरेश जगदाळे (वय 36, रा. शिरवली, ता. माण) यास शिवराज हनुमंत निकम (रा. वाठार स्टेशन), रोहिदास भगवान घोरपडे (रा. विखळे), किसन सखाराम केळगणे (रा. क्षेत्र महाबळेश्वर), गौरी रोहिदास घोरपडे (रा. विखळे), वैशाली किसन केळगणे, गौरी किसन केळगणे (दोन्ही रा. क्षेत्र महाबळेश्वर) या सहा जणांनी बस अडवून बस चालकास हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली.
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. सदर झालेल्या मारहाणीत चालक जखमी झाला असून या घटनेची फिर्याद एसटी बसचा चालक विशाल जगदाळे यांनी वाठार पोलिसात दिली असून तपास पो. हवा. चव्हाण करत आहेत.