गोडोली नाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले; सातारा बांधकाम भवनाची इमारत उभारण्यास मंजुरी

by Team Satara Today | published on : 19 June 2026


सातारा : सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाची नवीन भव्य इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 10.97 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ऐतिहासिक सातारा शहराला साजेशी अशी भव्य वास्तू साकारण्यात येणार आहे. दरम्यान, गोडोली नाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोवई नाका ते अजंठा चौक यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यावर सकारात्मक चर्चा झाली. करंजे नाका येथील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्यासाठी पाहणी करावी व त्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना दिले.

सातार्‍यातील शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीला अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, उपअभियंता रवींद्र अंबेकर, शाखा अभियंता रूपेश नरवर आदि उपस्थित होते.

सातार्‍यात बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार असून ही इमारत बांधण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंजुरी दिली आहे. सातार्‍याच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीला साजेशी अशी ही भव्य वास्तू उभारली जावी यासाठी इमातर आराखड्यासाठी वास्तूविशारदांमध्ये स्पर्धाही घेण्यात आली. यातील सर्वोत्तम आराखड्याचा विचार घेऊन सदर इमारत बांधण्यात यावी. या विकासकामामुळे सातार्‍याच्या ऐतिहासिक वैभवात भर पडेल अशी इमारत उभी राहावी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सूचना करून या नवीन इमारत बांधकामास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या कामास मंजुरी दिली असून निधी उपलब्ध करून दिला आहे.

दरम्यान, गोडाली नाका, साईबाबा मंदिर चौक येथे सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी पोवई नाका- गोडोली नाका ते अजंठा चौक यादरम्यान उड्डाणपूल उभारण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना दिले. तसेच

करंजे नाका येथे वाहतूक कोंडी समस्या निर्माण होऊन अपघात होत असतात. हे टाळण्यासाठी करंजे नाका ते म्हसवे रोड येथे अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्यावर चर्चा झाली. याठिकाणी अंडरपास की उड्डाणपूल उभारणे योग्य राहिल, याची पाहणी करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना दिले.

सातारा शहराला ऐतिहासिक वैभव लाभले असून शहराला साजेशी अधीक्षक अभियंता कार्यालयासाठी भव्य वास्तू उभारली जाणार आहे. सातारकरांना दैनंदिन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने पोवई नाका ते अजंठा चौक उड्डाणपूल उभारण्यावर सकारात्मक चर्चा झाली. याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत. गोडोली नाका, करंजे नाका येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरच उपाययोजना केली जाईल.

-ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोशल मीडियावरील टीकेनंतर शाहू कला मंदिराची होणार दुरुस्ती; दोन महिन्यांच्या नूतनीकरणासाठी नाट्यगृह राहणार बंद
पुढील बातमी
एमडी ड्रग्ज प्रकरणात कराडातील रेकॉर्डवरील गुंडास अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

संबंधित बातम्या