सातारा : शहरातील गांधी मैदानावर दहीहंडी महोत्सवादरम्यान रॅपर संबाटा याच्या आगमनावेळी स्टेज रिकामे करण्यावरून जोरदार राडा झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून संबाटाने कारमधून खाली न उतरताच तिथून पळ काढल्याने मैदानावर काही काळ चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
सातार्यात दहीहंडीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला. तालीम संघ आणि गांधी मैदान ही शहरातील दहीहंडीची मुख्य आकर्षणे ठरली होती. गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीसाठी तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या प्रसिद्ध मराठी रॅपर संबाटाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सायंकाळनंतर संपूर्ण राजवाडा परिसर आणि गांधी मैदानावर युवकांची तुफान गर्दी उसळली होती.
दरम्यान, संबाटाचे गांधी मैदानावर आगमन होताच उपस्थित तरुणाई बेभान झाली. मुख्य स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी जमल्याने संबाटाने स्टेज मोकळे झाल्याशिवाय कारमधून खाली न उतरण्याचा पवित्रा घेतला. आयोजकांनी स्टेज रिकामे करण्यास सुरुवात करताच काहींचा स्वाभिमान दुखावला आणि तिथेच वादाची ठिणगी पडली. बघता बघता या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारी आणि ढकलाढकलीत झाले. स्टेजवरील हा थेट राडा आणि वाढता तणाव पाहून संबाटा अक्षरशः घाबरला.
परिस्थिती चिघळल्याचे पाहून संबाटाने कारमधून बाहेर न पडता तिथून पळ काढणेच पसंत केले. मात्र, तो खाली उतरत नसल्याचे पाहून काही अतिउत्साही तरुण थेट त्याच्या गाडीवर चढले, ज्यामुळे मैदानात प्रचंड गोंधळ उडाला आणि हुर्ये होऊन चेंगराचेंगरी सदृश स्थिती उद्भवली. अचानक उद्भवलेली ही परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांचीही मोठी दमछाक झाली. आपल्या राकट शैलीतील गाण्यांमुळे अल्पावधीत गाजलेल्या संबाटाला पाहण्यासाठी ही तुफान गर्दी जमली होती; मात्र वाढलेल्या या राड्यामुळे अखेर दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले.
संबाटा गेला पळून ; गांधी मैदानावर तुफान राडा अन् हाणामारी; कारमधून न उतरताच रॅपरने काढता पाय घेतल्याने चेंगराचेंगरीची स्थिती
by Team Satara Today | published on : 09 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा