कोरेगाव : अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सर्व परिचित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांविषयी जर आस्था आणि तळमळ आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा. अगदी वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
आमदार शशिकांत शिंदे हे रविवारी दुपारी तीन वाजता ल्हासुर्णे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काळी दिवाळी आंदोलनाविषयी प्रतिक्रिया दिली होती, त्यावर बोलताना आ. शशिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना आवाहन करत त्यांच्यासारखी शेती आणि शेतीतील तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्याला आत्मसात करता यावे, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडावे लागले तरी बाहेर पडावे, असेही त्यांनी सूचित केले.
....तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला
राज्यातील मतदार यादी जोपर्यंत दोष मुक्त होत नाही, त्यातील दुरुस्ती केली जात नाही आणि तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी विनंती महाविकास आघाडीच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याद्या तपासल्या जातील, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांच्याकडेच यादी तपासणीला दिल्यावर त्यातून काय हाती लागणार आहे. एकीकडे ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे वेळेत निवडणुका घेतल्या पाहिजेत. मग सात वर्ष निवडणूक तुम्ही घेतल्या नाहीत, चार महिन्यांनी काय फरक पडतो, आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे.लोकशाही मार्गाने निवडणूक व्हाव्यात, असेही आ. शशिकांत शिंदे स्पष्ट केले.