कोविड सेंटर ते शिल्पकृती... व्हाया संग्रहालय; जागतिक वारसादिनी सुहास राजेशिर्के यांच्या धडपडीला आगळीवेगळी पोहोचपावती

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : कोविड सेंटरसाठी ताब्यात घेतलेली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची इमारत पुन्हा संग्रहालयाच्या ताब्यात यावी म्हणून प्रयत्न करणारे आणि इमारतीची साफसफाई करणारे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या कामाला शनिवारी त्याच इमारतीत न्याय मिळाला. जागतिक वारसादिनाच्या कार्यक्रमात याच इमारतीत शिल्पकाराने त्यांचेच शिल्प साकारले.
छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पूर्वीपासूनच अस्तित्वात होते; मात्र ते भाड्याच्या जागेत उभारले गेले होते. खासदार उदयनराजे भोसले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक अथांग प्रयत्नांतून संग्रहालयासाठी नवीन जागा मंजूर झाली. दोन्ही नेत्यांनी प्रयत्न करून संग्रहालयाच्या इमारतीसाठी निधी मिळवला व आरक्षित जागेत संग्रहालयाची अद्ययावत, देखणी वास्तू उभी राहिली.
भाड्याच्या जागेतील संग्रहालयात असलेले साहित्य आणि मौल्यवान वस्तू नवीन संग्रहालयांमध्ये हलविण्यात आल्या. त्यानंतर अचानक कोविडची महामारी आली आणि सातारा शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्णालये अपुरी पडू लागल्यामुळे शासनाने संग्रहालयासाठी बांधलेल्या इमारतीचा जिल्हा कोविड सेंटरसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे दिला. त्या ठिकाणी अद्ययावत कोविड सेंटर उभे करण्यात आले. रयतेचे राजे शिवछत्रपतींच्या नावाने उभारलेली संग्रहालयाची इमारत रयतेच्या सेवेत रुजू झाली. अनेकांचे प्राण या कोविड सेंटरमुळे वाचले.
कोविड महामारी संपल्यानंतर संबंधित इमारत संग्रहालयाच्या ताब्यात परत मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यांना यश येत नव्हते. त्यांनी ही बाब माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या कानावर घातली. इमारत पुन्हा संग्रहालयाच्या ताब्यात न देण्यामागे कुणाचा काही डाव असावा, या शंकेने राजेशिर्के यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र कोणीच साथ दिली नाही. मग राजेशिर्के यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि संबंधितांना काळे फसण्याचा इशारा दिला. त्यानंतर शासनाचे डोळे उघडले आणि शासनाने या इमारतीची पाहणी केली. इमारतीत कोविडकाळातील वैद्यकीय साहित्याचे अवशेष आणि वैद्यकीय कचरा सर्वत्र पसरला होता. इमारत रिकामी करताना तिची स्वच्छताही केलेली नव्हती. राजेशिर्के यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर लावून आपल्या टीमसोबत आणि संग्रहालयातील कर्मचाऱ्यांसोबत संग्रहालयाची वास्तू झाडून स्वच्छ केली. इमारतीतील वैद्यकीय कचरा बाहेर काढला. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधल्यानंतर संग्रहालयाच्या इमारतीचे काम पुन्हा सुरू झाले. त्याच काळात योगायोगाने लंडनमधून वाघनखे भारतात येणार होती आणि त्यांचे प्रदर्शन सर्वप्रथम सातारच्या संग्रहालयात करण्याचा निर्णय झाला होता. भव्यदिव्य कार्यक्रमाने वाघनखांचे स्वागत झाले आणि त्या निमित्ताने संग्रहालयाच्या इमारतीकडे इतिहासप्रेमींची पावले वळली. संग्रहालयाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही सर्वप्रथम सुहास राजेशिर्के यांनीच साजरी केली होती.
या पार्श्वभूमीवर शनिवारी या इमारतीत जागतिक वारसा दिन साजरा झाला. विविध कार्यक्रमांनी या कार्यक्रमाला शोभा आणली. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सातारचे शिल्पकार महेश लोहार यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी त्यांनी सुहास राजेशिर्के यांचेच शिल्प साकारले. संग्रहालय अभिरक्षक विनायक रावजी निटुरकर, लीलाधर उर्फ बंटीराजे भोसले, दिलीपराव गायकवाड, इतिहास अभ्यासक विजयकुमार वाईकर, जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळाचे सचिव योगेश चौकवाले, सदस्य प्रज्वल वाघमोडे, निलेश पंडित, सातारा कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांच्यासह विजय जाधव, बाळासाहेब चौगुले, कराडचे निवृत्त कलाशिक्षक बाबासाहेब पवार, डॉ. जयंत चव्हाण, विविध शाळांचे कलाशिक्षक, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी, कलाप्रेमी आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या निकालाने राजकीय वजन स्पष्ट; पालकमंत्री देसाईंचा गोरेंना आकडेवारीचा आरसा
पुढील बातमी
पंताचा गोट परिसरातील घरातून दागिने लंपास; दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या