महाबळेश्वर : ढोल-ताशांचा कडकडाट, भगवे ध्वज, फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी (दि. १६) रात्री मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. ३६७ मशालींच्या लखलखत्या प्रकाशाने अवघा किल्ला उजळून निघाला. हा सोहळा अनुभवण्यासाठी सातारा, रायगड, रत्नागिरीसह विविध भागांतून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावली.
खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे आणि दमयंतीराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मशाल महोत्सवाची परंपरा २०१० पासून सुरू आहे. यंदा या उत्सवाचे १६ वे वर्ष होते. त्यामुळे शिवभक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भवानीमातेची विधिवत पूजा आणि गोंधळ पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास मशाल महोत्सवाला प्रारंभ झाला.
रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर एकामागून एक ३६७ मशाली पेटविण्यात आल्या. मशालींच्या तेजाने किल्ल्याचा परिसर उजळून निघाला. यावेळी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने अवघा किल्ला दणाणून गेला.
गडावरील मंदिर परिसर आणि मुख्य प्रवेशद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मशालींचा प्रकाश, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या जयघोषाने भारावलेले वातावरण उपस्थितांच्या मनात शिवकालीन इतिहासाच्या आठवणी जागवणारे ठरले. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
महोत्सवासाठी प्रतापगड तसेच वाडा-कुंभरोशी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दूरवरून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारोंच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या सोहळ्याने प्रतापगड परिसर भक्तिमय आणि शिवमय झाला.
शिवरायांचा जयघोषात ३६७ मशालींच्या तेजाने उजळला ऐतिहासिक प्रतापगड; मशाल महोत्सवासाठी हजारो शिवभक्तांची उपस्थिती
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा