कराड : कराड शहर चारचाकी हातगाडा संघटनेचे (हॉकर्स संघटना) सदस्य असणार्या अरूण जगन्नाथ शिंदे (वय 42, रा. दागंट वस्ती, आगाशिवनगर मलकापूर) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण रविवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.
अरूण शिंदे हे आपल्या कुटूंबियांच्या मदतीने कराड बसस्थानक परिसरात कापड विक्रीचा व्यवसाय करत होते. मागील महिनाभरापासून बसस्थानक परिसरासह विविध विभागात कराड नगरपालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे जवळपास सर्वच हातगाडा व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळेच शिंदे हे तणावाखाली होते असे दावा हॉकर्स संघटनेच्या जावेद नायकवाडी यांच्यासह माजी नगरसेवक आनंदराव लादे यांच्याकडून केला जात आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असतानाच रविवारी शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. शिंदे यांनी विंवचनेतूनच टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा हॉकर्स संघटनेकडून केला जात आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, तपास सुरू असून आत्महत्येचे निश्चित कारण अद्यापही समोर आले नसल्याची माहिती रविवारी सायंकाळी कराड पोलिसांनी दिली आहे.