कास तलाव परिसरात सध्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस; कास तलाव ओव्हरफ्लो, पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात

by Team Satara Today | published on : 22 July 2026


सातारा : कास तलाव परिसरात सध्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून, तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी सांडव्यावरून वाहत आहे. या सांडव्याच्या पायऱ्यांवर पाण्यात उतरून पर्यटक आपला जीव धोक्यात घालत असून, अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव जाणवत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पालिकेसह वन विभाग, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाने संयुक्तपणे विशेष कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.

कास तलाव परिसरात सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. अनेक कुटुंबे, युवक- युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले तलाव परिसरात फिरण्यासाठी येत असतात. पाण्याची वाढलेली पातळी, तलावालगतचे घसरडे दगड, चिखलयुक्त रस्ते आणि काही ठिकाणी असलेले खोल पाणी यामुळे पर्यटकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असणे अपेक्षित असताना या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्‍या जीवितालाही धोका पोहोचू शकतो, अशा प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत. पावसाळ्यात कास तलाव परिसरात दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी ही संख्या हजारोंच्या घरात पोहोचते. एवढ्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित सुरक्षारक्षक, बचाव पथक, प्राथमिक उपचार केंद्र आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यापुढे सरकारने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यास आम्ही सर्वजण तुमच्यासोबत लढू - मनोज जरांगे पाटील, भाजपवर जोरदार हल्लाबोल

संबंधित बातम्या