सातारा : आपला व्यवसाय सांभाळून अन्य जोड व्यवसाय करण्यास अनेक जण इच्छुक असतात. युवा वर्ग शिक्षण घेत एखाद्या रोजगाराची संधी शोधत असतात. हेच ओळखून महावितरणने महापॉवरपे ॲपची निर्मिती केली आणि राज्यातील नागरिकांना घरबसल्या पैसे कमाविण्याची संधी दिली. या संधीचे सातारा जिल्ह्यातील ८३ नागरिकांनी (महापॉवरपे वॉलेटधारक) सोने केले आहे. त्यांनी महापॉवर पे या माध्यमातून आतापर्यंत २९ लाख ४०० रुपये कमविले आहेत. गेल्या सहा महिन्यांत सातारा जिल्ह्यातील पाच लाख ८० हजार ९४४ ग्राहकांनी ५८ कोटी ५९ लाख रुपयांचा वीजबिल भरणा केला होता. त्याचा लाभ महापॉवर पे धारकांना झाला.
महापॉवर पे रिचार्ज केल्यावर धारक महापॉवर पे ॲपमध्ये नोंदणी घेऊन महावितरणच्या ग्राहकांकडून वीजदेयकांची वसुली करू शकतात. वीजदेयक वसुली केवळ रोख रकमेच्या माध्यमातून करता येते. वीज देयक स्वीकृती केल्यावर महावितरणद्वारे नोंदणीकृत मोबाईलवर संदेश दिला जातो.
एका महापॉवर पे धारकास आपल्या ॲपला विविध व्यक्तींना लॉगिन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या पद्धतीत एकापेक्षा जास्त व्यक्ती जे ग्राहकांच्या घरोघरी जाऊन विविध लॉगिन ईनद्वारे एकाच महापॉवर पे बॅलन्स वापरून वीजदेयक वसुलीचे काम करू शकतात. या प्रकारे वसुलीचा लेखा- जोखा व कमिशन मुख्य महापॉवर पेमध्ये वर्ग केला जातो.
इच्छुक व्यक्तींनी महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी महावितरण उपविभागीय कार्यालयाद्वारे केली जाईल. नोंदणीसाठी व जागेच्या पडताळणीसाठी कोणतेही शुल्क लागू नाहीत.
महापॉवर पे रिचार्ज पद्धती
महापॉवर पे प्रथम रिचार्ज कमीतकमी पाच हजार रुपये करणे अनिवार्य आहे. त्यानंतर एक हजार रुपये या पटीत रिचार्ज करता येईल.महापॉवर पे धारक डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबॅंकिंगद्वारे आॅनलाइन पद्धतीने महापॉवर पे रिचार्ज करू शकतात.
महापॉवर पेधारक कोण होऊ शकते?
कोणतीही १८ वर्षांवरील व्यक्ती.
मेडिकल दुकानदार, जनरल स्टोअर्स, बचत गट, छोटे व्यवसाय करणारे घटक.
महावितरणची वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था.
विद्युत बिल भरणा करणाऱ्या संस्था.
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) जीएसटी नंबर- प्रमाणपत्र (लागू असल्यास)
4) गुमास्ता प्रमाणपत्र (वैयक्तिक व्यतिरिक्त इतरांसाठी लागू)
5) पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड वरील पत्ता कामाच्या जागेपेक्षा वेगळा असल्यास)
6) छायाचित्र
7) कॅन्सल धनादेश.