वैद्यनाथ ऑइल दुकानात अपहारप्रकरणी बहीण-भावावर गुन्हा; १२ लाख ७४ हजार १३४ रुपयांचा अपहार केल्याची घटना

by Team Satara Today | published on : 14 July 2026


वाठार : आदर्की फाटा येथील शॉपिंग सेंटरमधील वैद्यनाथ ऑइल या दुकानात कामगार म्हणून काम करत असलेल्या तडवळे संमत वाघोली येथील बहीण-भाऊ राजरतन ऊर्फ राजरत्न नाना बडेकर व अस्मिता नाना बडेकर या दोघांनी संगनमताने दुकानातील खाद्यतेलाचे डबे व बॉक्सच्या विक्रीतून तब्बल १२ लाख ७४ हजार १३४ रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कामगार असलेल्या बहीण-भावावर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्की फाटा येथे असलेल्या शॉपिंग सेंटरमधील वैद्यनाथ ऑइल ॲण्ड केमिकल्स या दुकानात संशयित कामगार म्हणून कार्यरत होते. संबंधित दुकान मालकाने विक्रीसाठी विश्वासाने दिलेल्या खाद्यतेलाच्या डबे व बॉक्सची दोघांनी मिळून संगनमताने विक्री केली.

१७ डिसेंबर पूर्वीचे दोन लाख ७१ हजार ९८२, तसेच १८ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या कालावधीत विक्री झालेल्या मालाची १० लाख दोन हजार १५२, अशी एकूण १२ लाख ७४ हजार १३४ रुपयांची रक्कम त्यांनी मालक पोपटराव गवळी यांच्याकडे परत न करता अपहार केला. गवळी यांनी संबंधित विक्रीतून आलेली रक्कम संशयिताकडे वारंवार मागणी करूनही न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोपटराव शंकरराव गवळी (रा. भिगवण रोड, जळोची, ता. बारामती, जि. पुणे) यांनी घटनेची फिर्याद वाठार पोलिस ठाण्यात दिली असून, तपास पोलिस हवालदार कर्णे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना खोऱ्यात पाऊस गायब, धरणातील पाण्याच्या आवकेत मोठी घट; धरण पूर्ण भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा
पुढील बातमी
पिंपोडे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू ; रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघांबरे यांचा पाठपुरावा : पालक विद्यार्थ्यांमध्ये समाधान

संबंधित बातम्या