मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात जेव्हा झाला, तेव्हा रवींद्र वायकर कारमध्येच होते, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातास कारणीभूत असलेला चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर आली आहे. दारुच्या नशेत कार चालवल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.
रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती घेतली असून पुढील कार्यवाही केली जात आहे. रवींद्र वायकर हे रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात होते. यावेळी जोगेश्वरी एसआरपीएफ कॅम्पाच्या समोर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेच जमखींबाबतची माहितीही कळू शकली नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा पराभव केला होता. अवघ्या ४८ मतांनी वायकरांचा विजय झाला होता. यानंतर किर्तीकर यांनी वायकरांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करत किर्तीकरांनी वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली.